Tuesday, 9 June 2015

   सामाजिक  सेवेची व्‍याख्‍या

-      अॅड. किशोर लुल्‍ला,
-सांगली.

          इतर देशात आणि आपल्‍या देशातला मुलतः फरक हा संस्‍कारांचा आहे असे म्‍हंटले जाते. एक तीळ सात जणात वाटून खावा तसेच लष्‍कराच्‍या भाक-या भाजण्‍यात काहीही गैर नाही किंबहूना ती आपली जबाबदारी आहे असे मानणा-यातला हा देश आहे. आणि त्‍यामुळेच स्‍वातंत्रयपूर्व काळापासून भारतात सामाजीक कार्यक-र्यांची कमतरता नाही. जे काही चांगले बदल झाले ते मुख्‍यतः सोशल वर्कर्समुळेच झाले यात कोणतेही दूमत नाही. याला कित्‍येक सर्वसामान्‍य नागरीकांची, चांगल्‍या राजकारण्‍यांची, प्रामाणीक शासकीय अधिका-यांची, उत्‍तम देणगीदारांची जोड मिळाली इतकेच.
          पूर्णवेळ, अर्धवेळ, महिन्‍यांतून एक दिवस, आठवडयातून एकच दिवस, जमेल तेव्‍हा  किंवा जमेल तसे असे सामाजीक कार्यकर्त्‍यांची प्रकार पडले आहेत. काहीही सामाजीक कार्य न करता सामाजीक कार्यकर्ता असल्‍याचे भासवणे हा ही एक प्रकार आपल्‍याला नवीन नाही. यातील उपप्रकारांमध्‍ये कामापेक्षा प्रसीध्‍दीला जास्‍त महत्‍व देणे, कामाचीच प्रसीध्‍दी करणे, कामाची अजीबात प्रसीध्‍दी न करणे अशासारखे अनेक प्रकार आपणांस माहीत आहेत.
या सर्व लिखाणामध्‍ये कोणालाही दोष देणे हा उद्देश नाही किंवा हा प्रकार चांगला आणि तो प्रकार वाईट असे मला म्‍हणायचे नाही. मूलतः कोणत्‍या ना कोणत्‍या मार्गाने तो सामाजीक सेवेशी जोडला गेला हे काय कमी नाही. मग त्‍याने कमी जास्‍त वेळ दिला काय, नियमीत 10 रुपये दिले काय किंवा कोटयावधी रुपयाची देणगी दिली काय, सर्वांना महत्‍व एकच. त्‍यामुळे सामाजीक कामाच्‍या पाहीजे तेवढया व्‍याख्‍या करता येतील आणि कदाचीत त्‍या सर्व बरोबरही असतील.  
          जे लोक सोशल किंवा चॅरीटी या शब्‍दांना अंगालाही लावू घेत नाहीत त्‍यांच्‍याविषयी मात्र थोडेसे चिंतन झाले पाहीजे. ज्‍या समाजाचा मी एक अनीवार्य भाग आहे त्‍या समाजातील दुःख, दैन्‍य, वेदना जर मला दिसत नसतील किंवा दिसत असून सुध्‍दा मी योजून कानाडोळा करत असेन तर माझे काही चुकत तर नाही ना याचा विचार अशा वर्गाने केला पाहीजे. माझ्या कार्यालयातील मॅनेजर, क्‍लार्क, शिपाई, ड्रायव्‍हर, घरातील मोलकरीण, स्‍वयंपाकीण, बागेतला माळी या सर्वांचे कुटुंबीय यांच्‍या विवंचनेबाबतीत जर मी कधीच चिंतन करीत नसेन तर माझा मेंदू, ह्दय मी तपासून घेतला पाहीजे. त्‍यावेळी शुगर, ईसीजी, इको, टीएमटी, कोलेस्‍टेरॉल बरोबरच मानसीकता टेस्‍ट करून घ्‍यावी. आपण पत्‍थर का दिल, बिगडा हुआ दिमाग यात कोठेतरी बसतो का हे जरुर जाणून घ्‍यावे.
त्‍याचा औषधोपचार अगदी सोपा आहे. त्‍याला कोणताही खर्च नाही, वेळ दयावा लागत नाही. स्‍टेटस कमी होत नाही. मात्र त्‍यातून अतीशय आनंद मिळेल याची मला खात्री आहे. काही उदाहरणे मी देत आहे. परंतू अशी उदाहरणे तुम्‍ही आपोआप शोधू शकाल.
प्रवासात ड्रायव्‍हरला वेगळ्या टेबलावर न बसवता स्‍वतः सोबत बसवा, मुलाच्‍या वाढदिवसाला त्‍याच्‍या इतर मित्रांसोबतच स्‍टाफ, मोलकरीण वगैरेच्‍या मुलानांही बोलवा, श्रीमंत मुलांच्‍या हातून गरीब मुलांच्‍या तोंडात केक भरवा आणि त्‍याला मुन्‍नाभाई सारखी जादूची झप्‍पी दयायला लावा. घरातील सर्व जुने कपडे, वस्‍तू, खेळणी, भांडी वगैरे वगैरे गरजूनां वाटून टाका, त्‍याचे फोटो मुलांच्‍या वहीवर चिकटवा आणि व्‍हॉटस अप वर सर्वांना पाठवा. सुट्टीच्‍या दिवशी मल्‍टीप्‍लेक्‍स्‍ किंवा मॉलला जाण्‍याच्‍या अर्धा तास अगोदर सहकुटूंब एखाद्या वृध्‍दाश्रम अगर बेवारस मुले सांभाळणा-या संस्‍थेस भेट द्या. वर्षातल्‍या कोणत्‍याही ठरावीक दिवशी सह कुटूंब रक्‍तदान करा. प्रकाश आमटे, सावरकर सारखे सिनेमे आवर्जून दाखवा. वगैरे वगैरे.
तुम्‍हांला कळणार पण नाही की कधी तुम्‍ही सामाजीक कार्यकर्त्‍याच्‍या व्‍याख्‍येत जावून बसलात.